पेठकिल्ला येथे किरकोळ वादातून हाणामारी; दिराची भावजय, भावाला काठीने मारहाण


‘कुत्र्यांना खाऊ घालण्या’वरून वाद पेटला

रत्नागिरी:- शहरातील पेठकिल्ला, श्रीराम मंदिर शेजारील परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत दिराने भावजय आणि भावाला काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या कारणावरून हा वाद विकोपाला गेला.

​फिर्यादी पर्णिका प्रवीण विलणकर (वय ५१, रा. पेठकिल्ला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.०० वाजताच्या सुमारास त्या घराबाहेर कुत्र्यांना जेवण घालत होत्या. त्याचवेळी त्यांचे दिर आणि आरोपी नितीन पंढरीनाथ विलणकर (वय ५२) तेथे आले.
​आरोपी नितीन विलणकर यांनी फिर्यादी आणि त्यांचे पती प्रवीण पंढरीनाथ विलणकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीने त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, आरोपी म्हणाला की, “तुम्ही कुत्र्यांना खाऊ घालता, त्यामुळे कुत्रे येथे येऊन त्रास देतात.”

​हा वाद वाढत असतानाच आरोपी नितीनने हातातील काठीने फिर्यादी पर्णिका विलणकर यांना हात आणि कपाळावर मारहाण केली. तसेच, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या साक्षीदार (फिर्यादींचे पती) प्रवीण विलणकर यांनाही कपाळावर, हातावर व पायावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

​या मारहाणीत पर्णिका विलणकर आणि प्रवीण विलणकर हे दोघेही जखमी झाले आहेत. पर्णिका विलणकर यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी नितीन पंढरीनाथ विलणकर याच्या विरोधात गु.र.नं. ४५७/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.