रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पानवल फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने पेट्रोल संपल्याचे नाटक करून एका व्यक्तीची मोटारसायकल घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामशंकर श्रीसंतराम (३६, रा. सध्या श्री जहीर यांचे घरी भाड्याने, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी; मूळ रा. केशवनगर, ग्रंथ, ता. मनकापूर, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीसंतराम हे काम करत असलेल्या ठिकाणी सुमारे २० ते २५ वयोगटातील, काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला एक अनोळखी इसम आला. त्याने श्रीसंतराम यांना “माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आहे, पेट्रोल आणण्यासाठी तुमची मोटारसायकल द्याल का?” असे सांगितले.
श्रीसंतराम यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मालक राजकुमार मधळ यांच्या मालकीची होंडा शाइन (एमएच०८-एई-२३९६) ही मोटारसायकल दिली. मात्र, तो अनोळखी इसम गाडी घेऊन निघून गेला तो परतलाच नाही. अशा प्रकारे त्याने श्रीसंतराम यांचा विश्वासघात करत सुमारे ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल लंपास केली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कायदा कलम ३१६ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.