Friday, October 30, 2026
spot_img
Home राजापूर पितांबरी कंपनीत चक्कर येऊन कामगाराचा मृत्यू

पितांबरी कंपनीत चक्कर येऊन कामगाराचा मृत्यू

राजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे कडूवाडी येथील एका ३५ वर्षीय कामगाराचा कामावर असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संजय गणपत पांचाळ (वय ३५, रा. ताम्हाणे कडूवाडी, ता. राजापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते गावातीलच ‘पितांबरी’ कंपनीमध्ये मजूर म्हणून कार्यरत होते.

​बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता संजय पांचाळ नेहमीप्रमाणे पितांबरी कंपनीमध्ये कामावर गेले होते. सकाळी १०.५५ वाजेच्या सुमारास कंपनीच्या सुर्वे प्लांटवर काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच बेशुद्ध पडले.

​कंपनीतील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पुढील औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, रायपाटण येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय पांचाळ यांची तपासणी केली असता, सकाळी ११.४८ वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.

​या घटनेबाबत मयताचे चुलत भाऊ सूर्यकांत पांचाळ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे ताम्हाणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.