Friday, October 16, 2026
spot_img
Home राजापूर अखेर १५ वर्षीय माहिराचा मृतदेह कांदळवनात आढळला

अखेर १५ वर्षीय माहिराचा मृतदेह कांदळवनात आढळला

नाणार इंगळवाडी खाडीतील दुर्घटना: राजापूर तालुक्यावर शोककळा

राजापूर:- तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील विस्तीर्ण खाडीपात्रात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक दुर्घटनेत खोल पाण्यात बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय माहिरा जुनेद भाटकर हिचा मृतदेह अखेर पाच दिवसांच्या अखंड शोधमोहिमेनंतर कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत मिळून आला. एकाच घरातील चार निष्पाप भावंडांचा एकापाठोपाठ असा करुण अंत झाल्यामुळे भाटकर कुटुंबीयांवर आभाळच कोसळले असून संपूर्ण राजापूर तालुक्यासह संपूर्ण कोकण परिसर तीव्र हळहळ आणि दुःखात बुडाला आहे.

काही दिवसांपूर्वी जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसमवेत उदरनिर्वाहासाठी स्थानिक खाडीपात्रात कालवे म्हणजेच मुळे काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढण्याच्या कामात मग्न असताना ही पाचही मुले खाडीकिनाऱ्याजवळच होती. मात्र, पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे तसेच पाण्याच्या तळाशी असलेल्या खोल खड्ड्यांची कल्पना न आल्याने मुले अचानक एकापाठोपाठ एक खोल पाण्यात बुडू लागली. लहान मुलांचा आक्रोश आणि आरडाओरडा कानी पडताच जवळच असलेल्या आई-वडिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान केले. उपस्थित लोकांच्या तत्परतेमुळे एका मुलीला वेळीच सुखरूप बाहेर ओढण्यात यश आले, परंतु दुर्दैवाने उर्वरित चार निष्पाप भावंडे पाण्याच्या जोरदार प्रवाहात आणि खोल डोहात ओढली गेली.

या दुर्घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते. शोधकार्याच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षीय मोहम्मद जुनेद भाटकर, ९ वर्षीय जुहेरिया जुनेद भाटकर आणि ११ वर्षीय बुशिरा जुनेद भाटकर या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र १५ वर्षांची माहिरा जुनेद भाटकर ही खोल पाण्यात बेपत्ता झाल्याने तिच्या शोधासाठी नाटे सागरी पोलीस, स्थानिक मच्छीमार, बचाव पथके आणि ग्रामस्थांचे अखंड प्रयत्न सुरू होते. अखेर सलग पाच दिवस खाडीच्या कानाकोपऱ्यात चाललेल्या अथक शोधमोहिमेनंतर खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करून मृतदेह पुढील आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. काळाने एकाच घरातील चार निष्पाप फुलांना हिरावून नेल्यामुळे या भीषण दुर्घटनेने नाणार परिसरातील प्रत्येक डोळा पाणावला आहे.