Friday, September 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावसाने उघडीप दिल्यास आंबा घाट चौदा दिवसांत होणार खुला

पावसाने उघडीप दिल्यास आंबा घाट चौदा दिवसांत होणार खुला

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावर आंबाघाटात गायमुखापासून काही अंतरावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असून, त्या दृष्टीने ठेकेदार कंपनीला सूचना दिलेल्या आहेत. पावसाने उघडीप दिली तरच पुढील १४ दिवसात हे काम पूर्ण होऊ शकेल. दुरुस्ती पूर्ण झाल्यास आंबाघाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णक्षमतेने खुला होणार आहे.

सध्या घाटातील अवजड वाहतूक बंद असून, एसटी बसेसही दिवसाच चालवण्यात येत आहेत. अतिमुसळधार पाऊस असेल तर या भागातून धिम्या गतीने वाहने चालवावी लागत आहेत. आंबाघाटातील गायमुखापासून दरम्यान एका धोकादायक वळणावर ३० जुलै रोजी रस्ता खचला होता. प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ अवजड वाहतूक बंद केली होती तर हलकी वाहने आणि एसटी बस सेवा सुरू ठेवली होती; मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्ता पुन्हा खचल्यामुळे एसटी सेवाही काही काळ बंद करावी लागली. यामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. १३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, आमदार किरण सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह आंबाघाटाची पाहणी केली. त्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना करून १४ ऑगस्टपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत एसटी बस वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी चोवीस तास पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी यांची नियुक्ती केली गेली आहे.
गेले १८ दिवस याच पद्धतीने आंबाघाटातून वाहतूक सुरू आहे. सुदैवाने, पाऊस कमी असल्यामुळे गायमुखापासून काही अंतरावर खचलेला भाग जैसे थे आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुण्यातील संस्थेच्या साह्याने येथे ‘एरडॉक्स प्लेट तंत्राचा’ उपयोग करून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम गेल्या दोन दिवसात सुरू झाले आहे. पाऊस कमी असल्यामुळे या कामाला वेग आलेला आहे.

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने कोकणकर आंबा घाटमार्गाचा अधिक उपयोग करतात. या कालावधीत घाटातील वाहतूक सुरळीत नसेल तर दळणवळणाची समस्या निर्माण होणार आहे, हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाला ११ दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच काम हाती घेण्यात आले आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तरच दुरुस्ती पूर्ण होईल. अन्यथा आंबाघाटातील वाहतुकीवर निर्बंधच राहणार आहेत.
दरम्यान, घाटात अद्याप अवजड वाहतुकीस बंदी असल्यामुळे या मार्गावरील दैनंदिन सुमारे ९०० मालवाहू वाहनांची ये-जा पूर्णपणे ठप्प आहे. व्यापाऱ्यांना पर्यायी आणि लांबच्या मार्गाने माल आणावा लागत असून, अतिरिक्त वाहतूक खर्च सहन करावा लागत आहे. याचा थेट फटका वस्तूंच्या दरावर होत असून, नागरिक व व्यापाऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.