रत्नागिरी:- पावस ते पुर्णगड मार्गावर गोळप येथील नायरा पेट्रोल पंपात कर्मचाऱ्याच्या बॅगेतील २२ हजार ५०० रुपयांची चोरी करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला पुर्णगड पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मद अली वल्द गुलाम हुसेन उर्फ हुसेन अब्बासी दालमा (४५, रा. लाजपत नगर, दक्षिण दिल्ली) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२१रोजी सायंकाळी ४.१५ वा.सुमारास पावस ते पुर्णगड मार्गावरिल गोळप येथील नायरा पेट्रोल पंपात घडली होती. त्यानुसार मुसद्दीक मुराद मुकादम ( ३२, गोळप, रनपार, रत्नागिरी) यांच्या मोटार (क्र. एमएच-०५ सीयु ४२०४) या गाडीचा गोळप-वडवली या ठिकाणातील नायरा पेट्रोल पंपावर वापर करुन तेथे काम करणारा पेट्रोल सोडणारा (फिलर) आदीत्य माटल या कर्मचाऱ्याच्या खांद्याला असलेल्या पैशाच्या बॅगेतील रोख रक्कम २२ हजार ५०० पळवली होती.या प्रकरणी मुसद्दीक मुकादम यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिस अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस हवालदार देऊसकर करत होते. तपासात पोलिसांनी हिंगणघाट जि. वर्धा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेला संशयित दालमा याला ३० नोव्हेंबरला अटक केली. त्यांनी पेट्रोल पंपावर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.