रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने रोख रक्कमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सूनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी बाराच्या सुमारास पाली-मोहितवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दत्ताराम राजाराम मोहित (वय ५९, रा. मोहितवाडी पाली, रत्नागिरी) यांच्या मुलाशी लग्न झाल्यानंतर सुनेने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन गुरुवारी त्यांच्या घरातील त्यांच्या बेडरुमध्ये असलेल्या लोखंडी कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलूप बंद पेटीचे कुलूप काढून त्यामध्ये ठेवलेले ६० हजार रोख रक्कमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांच्या विश्वासघात करुन पळविले. या प्रकरणी दत्ताराम मोहित यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









