रत्नागिरी:- शहरातील चर्मालय -स्टेट बॅंक कॉलनी येथे जाण्यासाठी रस्त्यात पार्क केलेला ट्रक बाजूला घ्या असे फिर्यादीने सांगितले. या रागातून रिक्षा चालकाला मारहाण व डोक्यात दगड मारुन दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोएब आझाद मुकादम (वय ३५, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी पावणेचारच्या सुमारास जेट एम पाटणकर रेसिडेन्सी, स्टेट बॅंक कॉलनी चर्मालय येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी फजल अब्दुल लतीफ गुहागरकर (वय ३९, रा. जेट एम. पाटणकर रेसिडेन्सी, स्टेट बॅंक कॉलनी-चर्मालय, रत्नागिरी) हे रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ४५९०) घेऊन घरी स्टेट बॅंक कॉलनी येथे आले असता इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर ट्क उभा होता. त्यामुळे त्यांना त्याच्या मालकीच्या पार्किंगमध्ये रिक्षा नेण्यास अडचण भासत होती. त्यावेळी त्यांनी सामान घेऊन आलेला ट्रक जरा बाजूला करा असे सांगितले. याचा राग धरुन संशयित शोएब मुकादम याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन तेथील दगड उचलून डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी फजल गुहागरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









