आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेला होता तरुण
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पानवल-वाघधरा परिसरात आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अविनाश अनंत घवाळी (वय ३३, रा. पानवल घवाळीवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश घवाळी हा तरुण बुधवारी दि. १ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वाघधरा येथील आपल्या आंबा कलमाच्या बागेत औषध फवारणीसाठी गेला होता. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या सासूने याची माहिती अविनाशच्या नातेवाईकांना दिली.
त्यानंतर नातेवाईकांनी बागेत जाऊन शोध घेतला असता, दुपारी २.१५ च्या सुमारास अविनाश बागेत उताण्या अवस्थेत बेशुद्धावस्थेत मिळून आला. यावेळी त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि डोक्याच्या मागील बाजूला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता. तसेच, त्याच्या उजव्या हाताजवळ औषधाची एक बाटली मिळून आली.
नातेवाईकांनी तात्काळ मदतीसाठी परिसरातील ग्रामस्थांना बोलावले आणि रिक्षाने अविनाशला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेबाबत रत्नागिरी पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पोलीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार पुढील तपास करत आहेत. औषध फवारणीदरम्यान विषबाधा झाली की अन्य काही घातपात, याचा शोध पोलीस घेत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









