रत्नागिरी:-/रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक आणि गोमांस विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आता जिल्ह्यात एक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत असून, यासाठी चार विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम २३ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार पोलीस उपविभागांसाठी स्वतंत्र भरारी पथके तैनात करण्यात आली असून, त्यांना संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, गोवंशीय तस्करीमध्ये वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्ती किंवा संघटित टोळ्यांवर कडक कारवाई केली जाईल. अशा गुन्ह्यांत गुंतलेल्यांवर ‘मोका’ (म.को.का. अधिनियम, १९९९) अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी हे नोडल अधिकारी म्हणून करणार आहेत. तसेच, गावपातळीवर माहिती संकलनासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांना समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी भरारी पथकपोलीस अधिकारी उपविभाग (कार्यक्षेत्र)संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. यामध्ये पथक क्र. १ पो.उ. नि. श्री. श्रीकृष्ण येवले खेड उपविभाग ८७७९६४५०९१, पथक क्र. २ पो.उनि श्री. ओम आघाव चिपळूण उपविभाग ७७७६०५९३७८, पथक क्र. ३ पो.उनि श्री. सागर शिंदे रत्नागिरी उपविभाग ९०२८३८९४४५, पथक क्र. ४ पो.उपनि सुधिर उबाळे लांजा उपविभाग ७३५००२८४८२, मुख्य नोडल अधिकारी (स्थानिक गुन्हे शाखा): पो.नि. श्री. नितीन ढेरे ९०११९९५७७७ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात गोवंशीय हत्या किंवा अवैध वाहतुकीची कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा.
संपर्क पर्याय: डायल ११२ (आपत्कालीन हेल्पलाईन) किंवा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा थेट संपर्क क्रमांक ८८५७८४८१५७ वर कॉल करावा. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









