लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
मंडणगड:- नळाला पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून म्हाप्रळ बंदरवाडी येथे एका व्यक्तीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष नथराम लांबे (वय ४३) आणि आरोपी अनंत बाब्या शिगवण (वय ५०) हे दोघेही म्हाप्रळ बंदरवाडी येथील रहिवासी आहेत. २५ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वादाची ठिणगी पडली. वाडीतील संजना लांबे या पाणी भरत असताना, शेजारी राहणाऱ्या वैभवी चव्हाण यांनी आरोपीने लावलेली पाण्याची बरणी बाजूला केली.
या कारणावरून आरोपी अनंत शिगवण हा वैभवी चव्हाण यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी फिर्यादी संतोष लांबे यांनी मध्यस्थी करत “शिव्या देऊ नकोस” असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांड्याने संतोष लांबे यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात लाकडी दांडा फिर्यादींच्या हनुवटीपासून जबड्यावर जोरात बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपीने “तुला खलास करून टाकतो” अशी जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी संतोष लांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी आरोपी अनंत बाब्या शिगवण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.









