नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यानंतरही गटार स्वच्छता न झाल्याचे विदारक चित्र समोर
रत्नागिरी:- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी शहरातील तुंबणाऱ्या गटारांची साफसफाई मोहीम हाती घेतली होती. मात्र, या मोहिमेनंतरही शहरातील अनेक भागांमध्ये गटारे तुंबलेलीच आहेत. नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यानंतरही गटारांची स्वच्छता न झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर , नगरसेवक बाबा नागवेकर, बंटी कीर तसेच नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान गटारसफाई आणि नाल्यांच्या देखभालीसंदर्भातील अनेक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. या पाहणीनंतरही संबंधित विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली नसल्याचे समोर आले .
दरवर्षी पावसाळ्यात रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी येथील भाजी मार्केटजवळ पाणी साचते. पावसाळा जवळ आला तरी येथील गटार साफ न केल्याने गटार तुंबलेलेच आहे. शहरातील काही ठिकाणी गटारांमध्ये प्लास्टिक कचरा, गाळ आणि इतर घाण साचलेली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर परिषद प्रशासनाने केवळ पाहण्या न करता प्रत्यक्षात तातडीने स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात तुंबलेल्या गटारांमुळे आरोग्याच्या समस्या तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.









