परूळेत पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयतीने वार

राजापूर:- तालुक्यातील परूळे पाटीलवाडी येथे पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयतीने वार केले. या प्रकरणी निशांत विश्राम सावंत (रा. परुळे, राजापूर) याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार ३ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्या मुकुंद माने यांचा चुलत पुतण्या निशांत सावंत एकमेकांच्या शेजारी- शेजारीच रहात असून गेल्या १० वर्षांपासून त्यांच्यात शौचालयाच्या टाकी बांधण्याच्या कामावरुन वादविवाद सुरु आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी तक्रारदार यांचा मुलगा घराबाहेर उभा असताना संशयित निशांत सावंतने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील कोयत्याने त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारुन दुखापत केली. या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी विद्या माने मध्ये पडल्या असता निशांतने त्यांनाही ढकलून दिले. यात त्यांना मुका मार लागला असून संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.