पतीकडून पत्नीवर विळ्याने वार; पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी

लांजा:– दारूच्या नशेत पत्नीवर विळ्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. दोघांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाने मागे खेचल्याने पुढील अनर्थ टळला. नशेतील रागाने झालेल्या या झटापटीत तोच विळा स्वतःच्या पोटात घुसल्याने पती वासुदेव पडये गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी तालुक्यातील कुर्णे येथे घडली. यामध्ये वासुदेव अर्जुन पडये (५०) व त्याची पत्नी अनिता पडये हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. 

या घटनेबाबत माहिती अशी की, कुर्णे पडयेवाडी येथील वासुदेव पडये हा दुपारी दारूच्या नशेत घरी आला होता. त्याने पत्नी अनिता पडये हिच्याबरोबर किरकोळ कारणावरून भांडण करू लागला. पत्नी जेवण करीत असतानाच तिच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ करत तिच्यावर विळयाने वार केला. तिने हात पुढे केल्याने विळयाचा वार बसून तिच्या डाव्या हाताची चार बोटे तुटली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेतील पत्नीवर प्राथमिक उपचार करून त्यांनाही अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.