दापोली:- तालुक्यातील नवानगर तांबडीकोड येथे अज्ञात चोरट्याने पंप हाऊसचे कुलूप तोडून आत ठेवलेले सुमारे ५२ हजार ६०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ततीक्षा सुदर्शन गायकवाड (४४, रा. दापोली काळकाईकोड) यांच्या नवानगर तांबडीकोड येथील जमिनीमध्ये बांधलेल्या पंप हाऊसमध्ये चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पंप हाऊसच्या सिमेंटच्या दरवाजाची कडी वाकवून व दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत ठेवलेले कंपाऊंडसाठी वापरण्यात येणारे ४८ हजार रुपये किमतीचे लोखंडी ४ फूट उंच व ५० फूट लांबीचे तारेचे ८ बंडल, २००० रुपये किमतीचा पाण्याचे बोरिंगचा स्टार्टर, २४०० रुपये किमतीच्या १०० फूट लांबीच्या गुलाबी व केशरी रंगाच्या १ इंची मापाच्या दोन पाण्याच्या पाईप्स, २०० रुपये किमतीच्या दोन लोखंडी पहारी आणि १००० रुपये किमतीच्या एसीसी सिमेंटच्या ०३ बॅगा, असा एकूण ५२ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या चोरीची तक्रार ततीक्षा गायकवाड यांनी दापोली पोलीस ठाण्यात ८ एप्रिल २०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.