रत्नागिरी:- शहरातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेतली. जसे ऊन पडेल तसे रस्त्यांवरचे खड्डे भरले जाणार असल्याचे मुख्याधिकार्यांनी मान्य केले असल्याचे कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या पंधरा दिवसात रस्त्यांची दुरूस्ती झाली नाही तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरण कामांमधील प्रशासकीय त्रुटी आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात डांबरीकरण झाल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यातून शहरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते मिलिंद कीर यांनी शहरवासीयांना 24 तास पाणी देण्याचीही मागणी यावेळी केली असल्याचे सांगितले. 24 तास पाणी दिल्यानंतर ते जलमापकामध्ये मोजले जावून त्यानुसार पाणीपट्टी येणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होईल. शीळसह पाणवल धरणातील पाणी शहरवासीयांना दिले जाणार असल्याने ते वर्षभर पुरु शकणार आहे. सध्या पाऊस वेळेत सुरू होवून दोन्ही धरणे भरली आहेत. याच कालावधीत दिवसभर पाणी देवून धरणांमधील पाणी कशाप्रकारे पुरवठ्यास येईल याचा अंदाज येईल. पावसाळ्यात 24 तास पाण्याचे नियोजन केल्यानंतर धरणातून असेच वाहून जाणारे पाणी वापरात येईल आणि पावसाळा असल्याने धरणातील पाणी भरतच राहणार असल्याचे मिलिंद कीर यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बबन आंबेकर, सईद पावसकर उपस्थित होते.