खेड येथील घटना
खेड:- वैद्यकीय रजेवरून पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी अर्ज देण्यासाठी आलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खेड येथे घडली. धर्मराज नामदेव वाडकर (वय ५६, रा. पाग, ता. चिपळूण) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. वाडकर हे चिपळूण येथील रहिवासी असून ते शिक्षण विभागात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी ते खेड येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभाग कार्यालयात आले होते. आपली वैद्यकीय रजा संपवून पुन्हा नोकरीवर हजर होण्याबाबतचा अर्ज त्यांनी लिपिक निलेश मधुकर चिटणीस यांच्याकडे सुपूर्द केला. अर्ज दिल्यानंतर कार्यालयात बसलेले असतानाच दुपारी १:२५ च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी ही बाब तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निलेश चिटणीस यांनी त्यांना तातडीने जवळच असलेल्या डॉ. बाल यांच्याकडे नेले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मुल्ला यांच्याकडे नेण्यास सांगितले. मात्र, डॉ. मुल्ला यांनी तपासणी करून त्यांना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वाडकर यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी १:३६ वाजता त्यांना ‘मृत घोषित’ केले.









