नोकरीच्या अमिषाने साडेचार लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- रायगड जिल्ह्यातील कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी दोन महिन्यांचा पगार द्यावा लागेल, असे सांगून एका तरुणाची ४ लाख ५६ हजार २२५ रुपयांची फसवणूक करण्यात आली. पूर्णगड पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.अमित मिश्रा, महेंद्र तिवारी आणि कंपनीचा प्रशासन अधिकारी (नाव, पत्ता, माहिती नाही) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार ४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान घडला.  

फिर्यादी अभिषेक वीरेंद्र सुर्वे (वय २१, रा. रनपार, रत्नागिरी ) हा एका खासगी ठिकाणी नोकरीला होता. त्याने चांगली नोकरी मिळविण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करून घेतला. त्यावर रायगड जिल्ह्यातील एक कंपनीमध्ये भरतीची जाहिरात पाहिली. ऑनलाइन फॉर्म भरून पाठवला. त्यानंतर संशयित अमित मिश्रा याने कंपनीचे अधिकार आपल्याकडे आहे. नोकरी पाहिजे असल्यास दोन पगार द्यावे लागतील, असे सांगितले. नोकरीची हमी दिल्यामुळे त्याने पैसे देण्याचे मान्य केले. त्यानंतर अभिषेक सुर्वे यांनी संशयित मिश्राने दिलेल्या बँक खात्यामध्ये ४ लाख ५६ हजार २२५ रुपये खात्यामध्ये भरले. त्यानंतर त्याने त्याचा मित्र निकेत पाटील याच्यामार्फत कंपनीमध्ये संपर्क साधून आलेल्या मोबाईलवरील जाहिरातीबाबत खात्री केली. ती बनावट असल्याचे समजले.