चालक, क्लिनर जखमी
देवरुख:- खडी घेऊन जाणारा डंपर पुलाचा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली. यामध्ये चालक व क्लिनर जखमी झाले असून बालंबाल बचावले आहेत. जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीताराम उत्तपा वडार व पुरूषोत्तम शांताप्पा हडलगी अशी जखमींची नावे आहेत. देवरूख ते मार्लेश्वर या मार्गावर सध्या रस्ते रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी खडी घेऊन जाणारा एक डंपर निवेखुर्द येथे पुलाचा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळला. एका वळणावर डंपरचा एक्सल तुटला अन् चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी, स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. चालक व क्लिनर यांना डंपरमधून सुखरूप बाहेर काढत प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हातापायाला गंभीर दुखापत असल्याने सीताराम वडार व पुरुषोत्तम हडलगी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.









