रत्नागिरी:- रत्नागिरीतील निवळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यु ऑपरेशन राबवण्यात आले .
शुक्रवार 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 05.30 वाजताच्या दरम्यान निवळी गावडेवाडी नंबर 2 जवळ किरण रघुनाथ साळवी यांच्या फार्म हाऊस येथील विहिरीत भक्ष्याचे शोधात असलेला बिबट्याचा बछडा विहिरीतील पाण्यात पडल्याचे प्रथम फार्म हाऊसचे केअर टेकर घाणेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विनय मुकादम, सुभाष मालप यांना कळवून ही माहिती निवळी गावचे उपसरपंच संजय नीवळकर यांना दिली. उपसरपंच हे लागलीच सदर विहिरीचे ठिकाणी पोहचून पाहणी करून खात्री झाल्यावर त्यांनी बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाणे व वनविभागाला दिली असता तेथे तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी पीआय यादव, बिट अंमलदार कोकरे, भिसे तसेच वनविभागाचे अधिकारी श्री गावडे, राजेंद्र पाटील, श्री अनिकेत, श्रीमती कदम हे हजर झाले.पिंजऱ्याच्या साह्याने व ग्रामस्थांच्या मदतीने वनविभाग व पोलिसांना बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. साधारण रात्री 09.30 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात कैद करून विहिरीतून सुखरूपपण बाहेर काढण्यात आले. सदर ठिकाणी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. सुभाष मालप, गोट्या मालप, वैभव मुकादम , दीपक कोगजे, विनय मुकादम, निलेश सावंत, विकास सावंत, प्रथमेश कोगजे, संजय जोशी, पिंट्या मलाप, सोहम कोकजे, तेजस कोकजे, सुनील गावडे, विघ्नेश मुकादम, बाळू कोकजे, पोलीस पाटील संजना पवार, पोलीस पाटील, भालचंद्र शितप, व अन्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.









