रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर निवळी कोकजेवठार परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने इनोव्हा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चालवून अपघात केल्याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताची खबर देणारे मंदार भार्गव निमकर हे आपली इनोव्हा क्रिस्टा कार (क्र. MH 08 AN 3020) स्वतः चालवत होते. त्यांच्यासोबत साक्षीदार अजिंक्य एकनाथ मोरे हे देखील होते. ते देवरुख-आंबव मार्गे रत्नागिरीच्या दिशेने कार घेऊन येत असताना, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते निवळी कोकजेवठार येथे पोहोचले.
त्यावेळी, निवळी फाटा ते बावनदी जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरून टेम्पो (क्र. MH 40 DC 2032) घेऊन जाणारा चालक सुरज सुरेश वाढवे याने आपले वाहन अत्यंत हयगयीने, बेदरकारपणे व भरधाव वेगाने चालवून मंदार निमकर यांच्या इनोव्हा कारला उजव्या बाजूला जोरदार धडक दिली आणि अपघात घडवला.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण मोटार अपघात अर्ज क्र. २५/२०२६ अन्वये चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर २४ जुलै रोजी रात्री १० वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक सुरज सुरेश वाढवे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









