जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन
रत्नागिरी:- जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने तब्बल ४ हजार ८१४ प्रकरणांची यशस्वी विनयन व तडजोड झाली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातील तिसरी राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात पार पडली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांपैकी १९ हजार ५२३ प्रकरणे, तर वाद दाखलपूर्व १५ हजार ४४४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित प्रकरणांमधील १७१ प्रकरणे आणि वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी ४ हजार ६४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी दिली.
या लोकअदालतीमध्ये वकील वर्ग व पक्षकारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. प्रामुख्याने प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, चेक बाऊन्स संबंधीचे खटले, वैवाहिक व कौटुंबिक वाद, बँका व पतसंस्थांचे कर्जविषयक वाद तसेच थकीत वीज व टेलिफोन बिल आदी प्रकरणांवर दोन्ही बाजूंच्या सामोपचाराने यशस्वी तोडगा काढण्यात आला. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समित्यांचे न्यायाधीश, विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









