निवळी येथे गॅस टँकरचा अपघात; चालक जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर निवळी येथे आज सकाळी पुन्हा गॅस टँकर पलटी झाल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र टँकरचा चालक जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरकडे गॅस घेऊन जाणारा एक टँकर आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निवळी फाट्याजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही, मात्र गॅसचा टँकर असल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, गॅस गळतीचा कोणताही धोका नाही आहे असे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, मात्र आता ती पूर्ववत सुरू झाली आहे. या ठिकाणी तत्काळ ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे आपल्या टीमसह दाखल झाले आहेत.