रत्नागिरी:- अन्न औषध प्रशासनाने तालुक्यातील निवळी येथे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. या कारवाईत मोटारीसह १५ लाख २० हजार ११६ रुपयांचा गुटखा पकडण्यास पोलिसांच्या सहकार्याने अन्न प्रशासनाला यश आले आहे. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल बलवंत घोरपडे (वय ३२, रा. मिरज खटाव, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. ११) सायंकाळी चारच्या सुमारास करण्यात आली. जिल्ह्यात हानिकारक गुटखा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची मदत घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली. कोकण विभागाचे अन्न औषध प्रशासन आयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व रत्नागिरी कार्यालय सहायक आयुक्त दिनानाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार गुरुवारी सकाळी अन्न सुरक्षाचे अधिकारी वि. जे. पाचपुते, गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार आकाश साळुखे यांच्यासह टीमने निवळी येथे सकाळी साडेसात वाजता सापळा रचला होता. सकाळी साडे आठच्या सुमारास सांगलीहून श्रीक्षेत्र गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मोटार (क्र. एमएच- ऐपी ४५४५) या वाहनाची तपासणी केली. वाहनामध्ये गुटखा, विमल पान मसाला, मिराज तंबाखू, सुगंधी तंबाखू, आरएमडी पान मसाला असा सुमारे ८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. वाहनासह पोलिसांनी १५ लाख २० हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या वाहनात सुरज राजू साळुखे व वाहन चालक विशाल घोरपडे हे दोघे होते. घोरपडे हा वाहन चालवत होता. त्यांची चौकशी केली असता हानिकारक गुटखा घेऊन गणपतीपुळे येथे जात असल्याचे संशयित घोरपडे यांनी सांगितले.स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित चालक विशाल घोरपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यत सुरु होती.