दापोली:- शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गिम्हवणे उगवतवाडी येथील व्यवसायिक निलेश बागकर याच्या खुन प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या दोन संशयित आरोपींना आज पुन्हा दापोली न्यायालयासमोर हजर केली असता त्यांना दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर असे की, ता. १३ जानेवारी रोजी गिम्हवणे येथील व्यवसायिक निलेश दत्ताराम बाक्कर त्याची पत्नी नेहा व कथित प्रियकर मंगेश चिंचघरकर रा. पालगड हे हर्णे समुद्रकिनारी फिरावयास गेले होते. समुद्रावर फेरफटका मारून झाल्यावर त्यातील संशयित आरोपी मंगेश आणि मृत निलेश बाक्कर या दोघांनीही हर्णे तील एका बियर शॉपीमधून दारू ची खरेदी केली व तेथुन हर्णे बायपास रस्त्यावर ते तिघेही आले. पार्टीचा बेत पूर्ण झाला. मंगेश हा शाकाहारी असल्याने केवळ निलेशच दारू प्यायला यामध्ये निलेश याला पत्नी नेहा व मंगेश यांनी दारूचा ओव्हर डोस पाजला. नेहा व मंगेश यांच्या कथित प्रेमाला निलेशचा कायम अडसर ठरू पाहत होता. त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी निलेश याचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. या नंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट तेथूनच २५ ते ३० किमी अंतरावर असणाऱ्या पालगड पाटीलवाडी येथील विहिरीत लावण्यात आली.
या नंतर नेहा हिने पती बेपत्ता असल्याचा बनाव करत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली. मात्र दापोली पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धिमते समोर तिचा बनाव फोल ठरला व अवघ्या ४८ तासात दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्या दिघानीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ता. १६ जानेवारी रोजी दापोली न्यायालयासमोर त्यांना हजर केली असता दापोली न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर मंगळवार ता. २१ जानेवारी रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केली असता त्यांना दोन दिवसांची वाढीव कोठडी मिळाली आहे या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी दापोलीचे एक पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत.