Tuesday, August 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पासंदर्भात ७ सप्टेंबरला जनसुनावणी

नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पासंदर्भात ७ सप्टेंबरला जनसुनावणी

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मे. सोशीयेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड, मडगाव, गोवा यांच्या प्रस्तावित ‘नाणार बॉक्साईट ब्लॉक’ प्रकल्पाबाबत ही जनसुनावणी होणार असून, स्थानिक नागरिकांना प्रकल्पासंदर्भातील आपली मते, सूचना व हरकती मांडण्याची संधी मिळणार आहे.
प्रस्तावित प्रकल्पांतर्गत १४४.९०५ हेक्टर क्षेत्रात प्रतिवर्ष ०.९ दशलक्ष टन क्षमतेने बॉक्साईट उत्खनन करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे राजापूर परिसरातील औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता नागरिकांच्या सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सागवे (घोडेपोई) येथील श्री कात्रादेवी मंगल कार्यालयात ही जाहीर जनसुनावणी पार पडणार आहे. प्रकल्पामुळे प्रभावित होणारे नागरिक, स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणविषयक संस्था व संघटनांना या सुनावणीमध्ये तोंडी अथवा लेखी स्वरूपात सूचना, हरकती, टीका-टिप्पणी व आपली मते मांडता येणार आहेत.
प्रकल्पासंदर्भातील पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तसेच कार्यकारी सारांश अहवाल मराठी व इंग्रजी भाषेत विविध शासकीय कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेऊन सुनावणीमध्ये आपली भूमिका प्रभावीपणे मांडता येणार आहे.
नाणार परिसरातील या प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या हिताचा विचार करण्याच्या दृष्टीने ७ सप्टेंबरची जनसुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.