Wednesday, September 23, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नाणार, झाडगाव एमआयडीसीत अंमली पदार्थ सेवन; दोघांविरोधात गुन्हा

नाणार, झाडगाव एमआयडीसीत अंमली पदार्थ सेवन; दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नाणार आणि झाडगाव एमआयडीसी परिसरात दोन जण अंमली पदार्थ सेवन करताना पोलिसांना आढळून आले. दोन्ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडल्या असून, संबंधितांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई नाणार इंगळवाडी परिसरात करण्यात आली. सागरी पोलिस ठाणे नाटेचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नाणार इंगळवाडीच्या दिशेने जात होते. सायंकाळी सुमारे ५.२१ वाजता नाणार मयेकर मांगर येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका प्लॉटमध्ये झाडीच्या आडोशाला एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांच्या नोंदीनुसार, अस्लम गुलाम मालपेकर (वय ४२, रा. नाणार इंगळवाडी, ता. राजापूर) हा अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य स्वतःजवळ बाळगून त्याचा सेवन करताना आढळून आला. याप्रकरणी सागरी पोलिस ठाणे नाटे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण विलास जाधव (वय ३०, नेमणूक सागरी पोलिस ठाणे नाटे) यांनी फिर्याद दिली. मालपेकर याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, दुसरी घटना रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव एमआयडीसी परिसरात घडली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाकडून गस्त सुरू असताना रात्री सुमारे ८.४५ वाजता अल्ट्राटेक कंपनीच्या मागील गेटजवळ एमआयडीसी अंतर्गत रस्त्याच्या बाजूला झुडपांच्या आडोशाला एक व्यक्ती आढळून आली. पोलिसांच्या नोंदीनुसार, अलिमियाँ अमिन गावखडकर (वय ३५, रा. शेट्येनगर, झाडगाव एमआयडीसी, रत्नागिरी; मूळ रा. पूर्णगड, आझाद मोहल्ला) हा गांजा सदृश अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुहास सुनील बोराटे (वय ४२, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली.

गावखडकर याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन व बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध भागांत गस्त आणि कारवाई सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे.