नाटे येथे मोबाईल शॉपी फोडून लाखोंचे मोबाईल लंपास

राजापूर:- तालुक्यातील नाटे येथे बाजारपेठेतील मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपयांचे मोबाईल लांबवल्याने खळबळ उडाली आहे. भर बाजारपेठेत घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी दुकान फोडून ऐवज लंपास केला. बाजूलाच पोलीस स्टेशन असल्याने या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, नाटे सडापेठ बाजारपेठेतील एसटी स्टँडनजीकच्या काझी यांची जैद मोबाईल शॉपी आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शॉपि फोडून लाखो रुपयांचे मोबाईल आणि अन्य साहित्य चोरून नेल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. आश्चर्य म्हणजे हाकेच्या अंतरावर सागरी पोलीस ठाणे आहे. तरीही अशाप्रकारची घटना घडत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मंगळवारी मोबाईल मालक दुकान उघडण्यासाठी गेले असता घटना निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात येत आहे. मात्र गेले काही दिवस या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.