रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे येथील तरुणाची 31 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
फसवणूकप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद स्वप्नील सुभाष कांबळे (24, संकल्प गृहनिर्माण संस्था सहयाद्रीनगर, नाचणे रत्नागिरी, मुळ धामणी बौध्दवाडी, संगमेश्वर) याने पोलीस स्थानकात दाखल केली. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 12.30 वा. च्या दरम्याने घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील कांबळे याच्या मोबाईलवर 15 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. त्याने महावितरणचे अॅप व एनीडेस्क एक लाल रंगाचा अॅप स्वप्नील याच्याकडून डाउनलोड करायला सांगितले. अॅन डाउनलोड करताच स्वप्नील याला सारस्वत बँकेतून एक ओटीपी प्राप्त झाला. ओटीपी समोरच्या व्यक्तीने मागून घेतला. यानंतर लगेचच स्वप्नील याच्या खात्यातील 30 हजार 869 रुपये लंपास करण्यात आले. आपल्या खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच स्वप्नील यांना शंका आली. तोपर्यंत 30 हजार रुपये गेले होेते. आपली फसवणुक झाली समजल्यानंतर त्यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत.