नागावे येथे तरुणावर कोयतीचा वार

चिपळूण:- विकोपाला गेलेल्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयतीने वार केल्याची घटना तालुक्यातील नागावे चैतन्य फर्निचरच्या परिसरात घडली. यात उमेश सुदेश जगताप (२४, नागावे) हा जखमी झाला असून वार करणारा लक्ष्मण महादेव वाघे (३५, अलोरे) याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी ८.१५ च्या सुमारास उमेश जगताप हा घरी कुटुंबासमवेत जेवणासाठी बसलेला होता. यावेळी काही कारणावरून उमेश व लक्ष्मण यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने यातूनच लक्ष्मण याने रागाने उमेश याच्या घराच्या दाराजवळ असलेली कोयती त्याच्या डाव्या बाजूच्या मानेच्या वर डोक्यात जोरात मारली. यात तो जखमी झाला.