नवीन भाजी मार्केटमधील गाळेधारकांना गुरुवारपर्यंत दिलासा

रत्नागिरी:- नगर परिषद माहितीच्या नवीन भाजी मार्केट इमारतीतील व्यावसायिक गाळेधारकांवर येत्या गुरूवारपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही. न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने मूळ दाव्यासंदर्भात असलेला अखेरचा युक्तीवाद करण्यास सहमती दिली. त्यामुळे आता अखेरच्या युक्तीवादानंतर गाळेधारकांनी आपापले गाळे सोडायचे की नाही याचा निकाल लागणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने गुरूवारी नवीन भाजी मार्केट इमारतीतील कोसळण्याच्या स्थितीत असलेले लाकडी सामान काढून टाकले. हे गाळे तोडण्यासाठीच आले असल्याची कुणकुण लागल्यानंतर सर्व गाळेधारक जमा झाले. यावेळी गाळेधारकांनी शुक्रवारच्या सुनावणीवेळी स्थगिती न मिळाल्यास येत्या मंगळवारपर्यंत गाळे रिकामी करून देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाकडून पुढील कोणतीही कारवाई झाली नाही.

रत्नागिरी नगर परिषदेने दुसरी नोटीस देवून धोकादायक इमारतीतील गाळे ताब्यात देण्यास सांगितले. त्याचबरोबर या इमारतीवर नोटीस फलक लावून इमारत कोसळून दुर्घटना झाल्यास रत्नागिरी नगर परिषद जबाबदार राहणार नाही, असा इशारा दिला. या दुसर्‍या नोटीसच्या पार्श्वभूमीवर कारवाई होवू नये यासाठी नोटीसला स्थगिती मागण्यासाठी गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली.

नवीन भाजी मार्केटची ही इमारत 1975 साली बांधलेली असून ती वापरण्यास धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर रनपने 2017 साली गाळे रिकामे करून इमारत खाली करण्याची नोटीस दिली. या नोटीस विरूद्ध पहिला दावा न्यायालयात प्रलंबीत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे वकील अ‍ॅड.निलांजन नाचणकर यांनी मूळ दाव्याचा अंतिम युक्तीवाद आहे तो पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यामुळे दुसर्‍या नोटीसला स्थगिती देण्याची गाळेधारकांची मागणी मागे पडली आणि पहिल्या मूळ दाव्याचा अंतिम युक्तीवाद करण्यावर सहमती दर्शवली. मूळ दाव्यावरील अंतिम सुनावणी होवून निकाल झाल्यानंतर स्थगितीसह इतर मुद्देही संपणार आहेत. तोपर्यंत म्हणजे 18 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही, अशी हमी रत्नागिरी नगर परिषदेकडून न्यायालयाला देण्यात आली आहे.

शुक्रवारच्या़ सुनावणीवेळी गाळेधारकांनी न्यायालयात गर्दी केली होती. त्यांना दुसर्‍या नोटीसच्या संदर्भात कारवाईला स्थगिती मिळेल, अशी अपेक्षा होती. गुरूवारच्या कारवाईवेळी जमलेल्या गाळेधारकांनी शुक्रवारी स्थगिती न मिळाल्यास गाळे मंगळवारी ताब्यात देतो असा शब्द रनपच्या अधिकार्‍यांना दिला होता. पहिला 2017 चा दिवाणी दावासुद्धा पहिल्या नोटीसनुसार कारवाई होवू नये म्हणून गाळेधारक न्यायालयात गेले आहेत.