Sunday, September 20, 2026
spot_img
Home खेड नदीकाठी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू

नदीकाठी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू

खेड:- फेरफटका मारण्यासाठी नदीकाठी गेलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. उपचारासाठी दापोली येथे नेल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला नेत असताना प्रकृती खालावल्याने त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

पांडुरंग गणपत डिगे (वय ६२, रा. पोयनार डिगेवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग डिगे हे पोयनार गावातील गोठणी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या चाव्यामुळे त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. त्यानंतर त्यांना प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले.

दापोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोयनार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.