रत्नागिरी:-मुसळधार पावसाचा तडाखा रत्नागिरी शहराला बसला. बाजारपेठेत जागोजागी पाणी तुंबले. काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात पाणी शिरले. त्यामुळे ऐन मध्यरात्रीत नागरिकांची तारांबळ उडाली. एकीकडे धो-धो पडणारा पाऊस आणि दुसरीकडे तुंबलेले पाणी घरात येऊ नये यासाठीची कसरत यातच रविवारची रात्र सरली. मच्छीमार्केट येथील पाच कुटूंबांचे स्थानिकांच्या सहकार्याने स्थलांतर करण्यात आले.
पाणी शिरल्यामुळे हजारो रविवारी सायंकाळनंतर पावसाला सुरवात झाली. रात्री पावसाने जोर धरला आणि सकल पाणी भागात पाणी साचू लागले. जिकडेतिकडे पाणीच पाणी अशी स्थिती शहरातील बाजार पेठ परिसरात पहायला मिळत होती. शहरातील मच्छीमार्केट परिसरात साडेतीन फुट पाणी तुंबले होते. या परिसरातील तोरण नाल्याची सफाई वेळीच न झाल्याने नाल्यातून वाहणार्या पाण्याची दिशा बदलली. वाहणारे पाणी रस्त्यावर आले. मुजावर कंपाऊंड, मोरे यांचे दुकान यासह मशिद जवळील परिसरात पाणी तुंबलेले होते. प्रवाह मुजावर कंपाऊंडमधील घरांमध्ये शिरले. ऐन मध्यरात्री नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 5 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे त्या कुटुंबीयांची चांगलीच झोप उडाली होती. वाहणारे मच्छिमार्केट, झारणी रोड परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर किशोरे मोेरे यांच्यासह काही नागरिकांनी आरोग्य सभापती निमेश नायर यांच्याशी संपर्क साधला. मध्यरात्री गटाराचे तुंबलेले पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा हलली. जेसीबीच्या साह्याने गटारारील लाद्या उचकटण्यात आल्या. त्यानंतर हळूहळू पाणी ओसरु लागले होते.
पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, गटारांची सफाई आणि रस्त्यांची कामे योग्य प्रकारे झाली नसल्यामुळेच रत्नागिरी शहराची ही स्थिती निर्माण झाली होती. शहरातील झारणी रोड, मच्छी मार्केटबरोबरच गाडीतळ, खालची आळी या परिसरातही गुडगाभर पाणी साचलेले होते. खालची आळी येथे सलग दुसर्या दिवशी ही स्थिती होती. या परिसरातील नागरिकांनीही पाण्याच्या भितीने रात्री जागून काढली. मारुतीमंदिर येथेही पाणी वेगाने खाली वाहत येत होते. रामआळी, गोखले नाका परिसरात पाणी योजनेची खोदाई केल्यान चिखलाचे साम्राज्य पसरलेले होते. एकीकडे खोदाईमुळे त्रस्त नागरिकांना मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भिषण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.









