धावत्या दुचाकीवर झाड कोसळून स्वार गंभीर जखमी

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा मोडकाआगर येथे रस्त्याशेजारील जुनाट अकेशियाचे झाड दुचाकीस्वारावर कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. हा दुचाकीस्वार झाडांमध्ये अडकलेल्या स्थितीत होता. त्याला वरवेली ग्रामस्थांनी बाहेर काढून पुढील उपचारासाठी नेले. सोमवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पालशेत गावातील सुशांक आरेकर हा तरुण आपल्या ताब्यातील बुलेट घेऊन पालशेतवरून शृंगारतळी येथे जात होता. यावेळी मोडका आगर जवळील वरवेली आगरेवाडीफाटा येथील आकेशियाचा जुनाट वृक्ष अचानकपणे गाडीवर कोसळला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याच रस्त्यावरून वरवेली गावचे सरपंच नारायण आगरे प्रवास करीत होते. त्यांच्या समोरच हा अपघात झाला. त्यांनी लगेचच वरवेली गावातील ग्रामस्थांना तसेच मोडकाआगर रिक्षा स्टैंड येथील सर्व रिक्षा चालक त्याचप्रमाणे वरवेली गावचे पोलीस पाटील सुजित शिंदे यांना याची माहिती दिली.

गावातील ग्रामस्थांना तसेच मोडकाआगर रिक्षा स्टैंड येथील सर्व रिक्षा चालक त्याचप्रमाणे वरवेली गावचे पोलिसपाटील सुजित शिंदे यांना याची माहिती दिली. सर्वांनी झाडांच्या फांद्यामध्ये अडकलेल्या स्थितीतील दुचाकीस्वारास बाहेर काढले. सरपंच नारायण आगरे यांनी मोडकाआगर येथील रिक्षेतून पुढील उपचारासाठी शृंगारतळी येथील डॉ राजेंद्र पवार यांच्या येथे हलवले.

दरम्यान, हा वृक्ष रस्त्यावरच कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. सर्व वाहने मार्गस्थ होण्यासाठी सरपंच नारायण आगरे लगेचच अरुण विचारे यांना याची कल्पना दिली. यावेळी याच मार्गावरून जेसीबी जात होता. त्याला तिथेच थांबवून सदर झाड बाजूला करण्याची विनंती केली. लाकूड व्यावसायिक अरुण विचारे यांनी कामगारांसह येऊन रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले व वाहतूक सुरळीत झाली.

या दुर्घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी त्वरित भेट दिली. या प्रसंगी वरवेली गावचे सरपंच नारायण आगरे, पोलिस पाटील सुजित शिंदे, ग्रामस्थ व सर्व रिक्षा चालकांनी विशेष सहकार्य केले.