Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून वाद; वृद्धाला मारहाण

धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून वाद; वृद्धाला मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील ओझरवाडी येथील शंकर मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत कृष्णा फके (वय ७३, रा. ओझरवाडी, शंकर मंदिर समोर, ता. चिपळूण) यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे राखणेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जेवणाच्या मानाच्या ताटावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी अक्षय करंजकर, गणेश शंकर आग्रे, प्रतिक घेवडेकर आणि मंदार गरव यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घाबरलेल्या यशवंत फके यांनी घरात आश्रय घेतला. मात्र, आरोपी त्यांच्या पाठोपाठ घरात शिरले आणि त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत कमरेवर व पाठीवर गंभीर दुखापत झाली. तसेच प्रतिक घेवडेकर आणि मंदार गरव यांनी उजव्या पायाच्या खुब्याजवळ लाथ मारल्याने यशवंत फके यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

ही घटना दि. २९ एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी दि. ६ मे रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.