Sunday, June 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा

धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनच्या धुमाकुळामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात नव्या पाण्याची प्रचंड आवक सुरू झाली आहे. धरण क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत असली, तरी सोबतच मोठ्या प्रमाणावर गाळयुक्त गढूळ पाणी धरणाच्या मुख्य साठ्यात मिसळत असल्याने पाणी शुद्धीकरणाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

धरण क्षेत्रातून थेट जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या या गढूळ आणि गाळमिश्रित पाण्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी रत्नागिरी नगर परिषदेची यंत्रणा हायअलर्टवर आहे. पालिकेची दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रे सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ नये म्हणून २४ तास सातत्याने फिल्टर बेड वॉश केले जात आहेत, तसेच योग्य प्रमाणात क्लोरिनेशन करून शुद्ध पाणी सोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नव्या पाण्याच्या प्रचंड आवकीमुळे पाण्याचे मुख्य स्रोत गढूळ झाले आहेत. हीच स्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगर परिषदेने खबरदारीचा इशारा दिला आहे. शहरात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरात पाणी वापरताना तुरटीचा वापर करावा, तसेच पिण्याचे पाणी अनिवार्यपणे पूर्ण उकळून आणि गाळूनच प्यावे, असे आवाहन रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.