रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायक जवळील चढाावावर शनिवारी सकाळी अत्यंत विचित्र आणि गंभीर अपघात घडला. समोरासमोर आलेल्या दोन एसटी बसेसच्या धडकेनंतर त्यांच्या मागे असलेली एक कार अनियंत्रित होऊन एसटीवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकूण २२ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रत्नागिरीहून पावसकडे जाणाऱ्या आणि पावसकडून येणाऱ्या दोन एसटी बसेस झरी विनायक जवळील चढावात समोरासमोर धडकल्या. हा अपघात घडत असतानाच, पाठीमागून वेगात येत असलेली एक कार एसटी बसेसवर जाऊन आदळली. त्यामुळे हा अपघात अत्यंत विचित्र स्वरूप धारण करून अधिक गंभीर झाला.
या विचित्र मालिकेच्या अपघातात बसमधील आणि कारमधील मिळून एकूण २२ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातामुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.









