रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनजी नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ओम्नी आणि टेम्पो रस्त्यात उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
पहिली कारवाई १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५३ वाजण्याच्या सुमारास धनजी नाका रिक्षा स्टँडजवळील मुख्य रस्त्यावर घडली. केदार कमलाकर हरमले (२९, व्यवसाय चालक, रा. कोळंबे गोरीवलेवाडी, रत्नागिरी) याने त्याच्या ताब्यातील ओम्नी (एमएच-०८- आर-२७३२) ही गाडी रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती की, तेथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला.
दुसरी कारवाई त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धनजी नाका ते गाडीतळ जाणाऱ्या रस्त्यावर लंबोदर आर्ट्स दुकानासमोर घडली. फैजुद्दीन लतिफ शेख (४२, व्यवसाय चालक, रा. कुरकुंभ, मशिदीजवळ, ता. दौंड, जि. पुणे) याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच-४२- एक्सयू-४८७५) रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभा केला होता.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. धनजी नाका परिसरातील या सलग कारवायांमुळे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चालकांना शिस्तीचा इशारा मिळाला आहे.









