देहव्यापार प्रकरणातील ‘त्या’ खोली मालकाला जामीन मंजूर

रत्नागिरी:- मिरजोळे-एमआयडीसी येथील देहव्यापार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. सुनिलकुमार गणपत प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १८ सप्टेंबर २०२५ ला घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी येथे एक नेपाळी महिला दोन तरुणींच्या माध्यमातून देहव्यापार चालवत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गीता थापा या नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासामध्ये ज्या एमआयडीसी मधील ६९ नंबरच्या प्लॉटमध्ये हा प्रकार चालविला जात होता. तो सुनिलकुमार प्रभू यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली होती. तसेच गीता थापाने काही पैसे प्रभू याला ऑनलाइन पाठविल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रभू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर प्रभू यांनी जामीन अर्जात न्यायालयापुढे सांगितले की, आपण कोणताही गुन्हा केला नाही. आपल्याला चुकीच्या पद्धतीने फसवून गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. आपला कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. आपण सुशिक्षित ६० वर्षाचे आहोत. माझी आई ९५ वर्षाच्या असून अविवाहित बहिणीसोबत राहतात. गीता थापा ही मोलकरीण म्हणून ठेवली होती आणि तिला राहण्यासाठी एक खोली दिली होती. त्या खोलीचा तिने चुकीच्या हेतूने वापर केला. आपला वेश्या व्यावसायाशी काही ही संबंध नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात यावा अशी न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने २५ हजाराच्या जातमुचलक्यावर संशयिताचा मुक्तता केली.