देवरुख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणातील सहआरोपीला पोलीस कोठडी

देवरूख:- येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटलेल्या गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या सागर कदम (रा. हातखंबा, रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यामार्फत अपहरण प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींची चौकशी करून शोध घेण्यात येणार आहे.

देवरूख येथील सोने व्यापारी धनंजय केतकर यांना दि.१७ सप्टेंबर रोजी जबरदस्तीने इर्टीगा गाडीत कोंबून अपहरण करण्यात आले होते. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडली होती. अपहरणकर्त्यांनी केतकर यांच्याकडून १४ लाख रूपये किंमतीच्या सोन्यासह २० हजार रूपयांची रोख रक्कम लुटली. तसेच केतकर यांना वाटूळ येथे पुलाखाली सोडून देण्यात आले होते. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये सागर कदम हा सहआरोपी असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी सागर कदम याच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु रत्नागिरी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सागर कदम हा दि.२० नोव्हेंबर रोजी देवरूख पोलिसांना शरण आला असून त्याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्याकडून इतर आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे.