प्रेयसीला संपवण्यापूर्वी केले होते दोन खून
रत्नागिरी:- प्रेयसी भक्ती मयेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दुर्वास पाटील याचे कारनामे बाहेर पडू लागले आहेत. भक्तीपूर्वी राकेश जंगम याचीही हत्या केली होती. तर आता तिसऱ्या हत्येची त्याने कबुली दिली असून बारमधील कामगाराला बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात खुनाचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेयसीची हत्या करणारा दुर्वास पाटील हा नराधम प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरूणीचा गळा दाबून तिला ठार मारून तिचा मृतदेह दुर्वासने आंबा घाटातील दरीत टाकला होता. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दुर्वास पाटीलसह विजय विश्वास पवार, सुशांत नरळकर या तिघांना अटक केली होती. त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीच्या कालावधीत दुर्वासचे एकेक कारनामे बाहेर पडू लागले आहेत.
सुमारे वर्षभरापूर्वी राकेश जंगम हा 28 वर्षीय तरूण दुर्वासच्या बारमध्ये कामाला होता. दि.6 जून 2024 पासून तो बेपत्ता होता. त्याबाबत तरूणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राकेश बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल केली होती. परंतु राकेशचा शोध लागला नव्हता. भक्ती हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर राकेशची हत्या केल्याची कबुली दुर्वासने दिले आहे. दि.6 जून 2024 रोजी कोल्हापूर येथे जायचे आहे असे सांगून दुर्वासने राकेश जंगम याला गाडीत घेतले. सोबत विश्वास पवार, निलेश भिंगार्डे हे दुर्वासचे दोन सहकारी सोबत होते. प्रवासादरम्यान दुर्वास व निलेश यांनी राकेशची गाडीतच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आंबा घाटातील दरीत त्याचा मृतदेह फेकून दिला.
राकेशच्या हत्येपूर्वी अजुनही एका कामगाराची हत्या केल्याची कबुली दुर्वासने पोलिसांना दिली आहे. किरकोळ कारणावरून बारमधील कामगाराला बेदम मारहाण दुर्वासने केली होती. यामध्येच त्या कामगाराचा मृत्यू झाला होता. मारहाणीनंतर काही दिवसांनी त्या कामगाराचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. दुर्वास पाटील याची पंचक्रोशीत दहशत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार देण्याचे धाडस कोणीही दाखवले नव्हते. परंतु भक्ती हत्या प्रकरणानंतर पूर्वी केलेल्या दोन्हीही खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दुसऱ्या कामगाराच्या हत्येप्रकरणी दुर्वाससह त्याच्या सहकाऱ्यांवर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच व्यक्तीने गेल्या दीड वर्षात तीन खून करण्याची पहिलीच घटना असून पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांनी हत्या प्रकरणात पूर्ण कौशल्याने उघड केले आहे.
बेपत्ता व्यक्तींची माहिती मागवली
दुर्वास पाटील यांने तिघांची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी जयगड पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागवली आहे. ते बेपत्ता होण्यामागे दुर्वास पाटील याचा हात आहे का? हे शोधण्याचे काम पोलीस करत आहे.