दापोली:- शहरातील रसिकरंजन नाट्यगृह परिसरातून पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
जळगाव येथील रहिवासी व व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र काशिनाथ चव्हाण यांनी आपली सुझुकी एक्सेस १२५ सीसी (क्र. MH 08 AS 8996) ही दुचाकी दि. २१ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रसिकरंजन नाट्यगृहाशेजारी असलेल्या श्री समर्थ अर्थमुव्हर्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना सदर दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली नाही. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. 247/2025, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता त्यामध्ये दिसणाऱ्या संशयित व्यक्तीशी आरोपीचे साम्य आढळून आले.
दरम्यान, दापोली पोलीस ठाणे हद्दीत हर्णे येथे दि. २३ जानेवारी रोजी रात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. किरण संतोष हिलम (वय २२ वर्षे), रा. माणगाव, दत्तनगर, आदिवासीवाडी, ता. महाड, जि. रायगड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीस विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार मेमोरंडम पंचनाम्यान्वये गुन्ह्यात चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यास उद्या रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच आरोपीने यापूर्वी अशा स्वरूपाचे आणखी गुन्हे केले आहेत का, याबाबत दापोली पोलीस सखोल तपास करीत आहेत.









