राजापूर:- दारू पिण्यासाठी लागलेल्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाला दुसऱ्याने लाकडी बॅट आणि नंतर दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ परिसरात घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रितम दिलीप शेट्ये (वय ३५, रा. वाडापेठ, राजापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेट्ये आणि आरोपी अमोल रमेश सकपाळ (रा. वाडापेठ, आडीवरे) हे दोघे १२ नोव्ह २०२५ रोजी कशेळी येथे गेले होते. तेथे एका गायीला सोडून आल्यानंतर त्यांनी करोळी परिसरात एकत्र बसून दारू प्राशन केली. यावेळी दारूचे पैसे देण्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून आरोपी अमोल सकपाळ याने तत्काळ फिर्यादी प्रितम शेटवे यांना लहान लाकडी बॅटने मारहाण केली. यानंतर काही वेळातच, शेट्ये हे आरोपीच्या गाडीतून वाडापेठ येथे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास परत आले.
येथे ते श्री महाकाली मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या आपणकर यांच्या सलूनच्या बाहेर बसले असताना, आरोपी अमोल सकपाळ पुन्हा एकदा संतापलेला तेथे पोहोचला. त्याने सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हातात लाकडी दांडा घेऊन येऊन फिर्यादीस पुन्हा मारहाण केली.
या मारहाणीत प्रितम शेटवे जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद प्रितम शेट्ये यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. राजापूर पोलिसांनी या घटनेची नोंद गु.आर.नं. ८७/२०२५ अशी केली असून, आरोपी अमोल रमेश सकपाळ याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) (मारहाण) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.









