राजापूर:- तालुक्यातील वाघ्रण येथे गुरुवारी १ मे रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पुतण्याने दारूच्या नशेत काकाला मारहाण केल्याची घटना घडली. नितीन नामदेव जाधव (वय ३६, रा. वाघ्रण) असे आरोपीचे नाव असून, प्रभाकर रामचंद्र जाधव हे त्याचे काका आहेत. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभाकर जाधव यांच्या घरासमोर आरोपी नितीन जाधव दारू पिऊन आला आणि त्यांना शिवीगाळ करू लागला. फिर्यादी यांनी त्याला ‘तू मला का शिवीगाळ करतो आहेस’ असे विचारले, याचा राग आल्याने नितीनने जमिनीवरून एक मोठा दगड उचलून प्रभाकर यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे ते जखमी झाले.
या घटनेनंतर प्रभाकर जाधव यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नितीन जाधव याच्या विरोधात भारतीय गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.