दापोली:- दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील विसापूर येथील समशेर अली नगर मोहल्ला येथे एका घरामध्ये कत्तल करण्याकरिता कोंडून ठेवलेल्या २९ गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली तर एकावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिली. रत्नागिरी पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील संवेदनशील गोष्टींकडे अधिक लक्ष वळवले असून त्यामुळेच दोन दिवसात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तली संदर्भात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक ७ जून रोजी दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील विसापूर येथील समशेर अली नगर मोहल्ला येथे एका घरामध्ये गोवंश जनावरे कत्तल करण्याकरिता कोंडून ठेवले असले बाबतची गोपनीय माहिती दापोली पोलिसांना प्राप्त झाली. त्या वरून या गुप्त बातमीची शहानिशा करून दापोली पोलीसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी गोठ्यामध्ये जखडून बांधून व कोंडून ठेवलेले बैल, गायी व छोटी वासरे मिळून आली. याचप्रमाणे मोहल्यामध्ये हानीफ शेख अली मालवणकर याचे घरालगत असणार्या जंगल युक्त भागात देखील अधिक पाहणी करीत असताना ३ गोवंश जनावरे कत्तल करण्याकरिता जखडून बांधून ठेवली असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी गोठ्यातील व जंगलयुक्त भागातील असे एकूण १० बैल, १५ गायी व ४ वासरे अशा सर्व गोवंश जनावरांची तात्काळ सुटका करून व त्याना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा करण्यात आली आहेत. तर या प्रकरणी आरोपी हानीफ शेख अली मालवणकर यास ताब्यात घेतले असून त्याचेसह त्याचा मुलगा तसेच भाऊ या तीनही आरोपीं विरोधात दापोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे. ही कामगिरी दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पो.उ.नि.राजकुमार यादव, पो.उ.नि.महेश पाटील, पो.उ.नि. हेमराज निर्मळ, पो.उ.नि.मिलिंद चव्हाण, पो.हवा.अभिजीत पवार, पो. हवा.रुपा ढोले, पो. हवा.साक्षी गुजर, पो.कॉ. विकास पवार, पो.कॉ.विजयंन सातार्डेकर, पो.कॉ.सुरज मोरे, पो.कॉ.विशाल कदम, पो.कॉ.निलेश जाधव व पो.कॉ.अतुल सापते व आदींनी केलेली आहे.









