दापोलीतील 8 जणांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

दापोली:- दापोली तालुक्यातील कर्वे येथील हॉटेल कल्पतरुजवळ अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २६ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय अनिल मोरे (वय ३०, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी दापोली पोलीस ठाण्यात २७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून ६ मिनिटांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय मोरे आणि त्यांचे मित्र राकेश चौधरी हे साहील बारमधून जेवण करून ते राहत असलेल्या हॉटेलच्या रूमकडे परत येत होते. हॉटेलजवळ एका पुलावर आले असताना त्यांच्या गाडीवर कोणीतरी बॅटरीचा प्रकाश मारला. तेथे सात ते आठ अनोळखी इसम उभे होते. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला भीती वाटली आणि ते तात्काळ हॉटेलच्या इमारतीजवळ गेले. त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावून खाली उतरताच, त्या अज्ञात टोळक्याने धावत येऊन त्यांना हाताच्या थापटांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे अक्षय मोरे याने तक्रारीत म्हटले आहे.

दापोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.