कामतकोड येथील ‘वेलकम हॉटेल’ समोर अपघात
दापोली:- दापोली-पांगारी मार्गावर कामतकोड येथील वेलकम हॉटेलसमोर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी एका बस चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ५ मे रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास दापोली ते पांगारी अशी जाणारी एसटी बस (क्र. MH 20 BL 2273) कामतकोड येथील वेलकम हॉटेलसमोरील वळणावर आली होती. त्याच वेळी समोरून पांगारी ते दापोली अशी येणारी एसटी बस (क्र. MH 20 BL 3205) वरील चालक पंडलीक शिवाजी केन्द्रे (वय ३५, रा. उदयनगर, दापोली) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने चालवून समोरच्या बसला जोराची धडक दिली.
या भीषण धडकेत दोन्ही एसटी बसचे नुकसान झाले आहे. या अपघातात एका बसची समोरची काच फुटली असून उजव्या बाजूचा हेडलाईट आणि बंपर तुटला आहे. तर दुसऱ्या बसचीही दर्शनी काच फुटून हेडलाईट आणि बंपरचे नुकसान झाले आहे.वळणावर बसचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या अपघाताबाबत दापोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल साक्षी संदीप गुजर यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून चालक पंडलीक केन्द्रे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ८६/२०२६) दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









