दापोली:- दापोली बाजारपेठेतील चिल्लंगी मोहल्ला येथे एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ४ मे २०२५ रोजी रात्री २२.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद जमा इस्तफाक अहमद शेख (वय २८, मूळ रा. दर्गजोत संत कबीर नगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. दापोली चिल्लंगी मोहल्ला) हा दापोली बाजारपेठ येथील एका इमारतीच्या टेरेसवर गांजा ओढत असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल उदय केशव टेमकर यांनी घटनास्थळी छापा टाकला आणि शेख याला गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उदय टेमकर यांच्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८(क), २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.