दापोली येथील समुद्रात सहाजण बुडाले; एकजण बेपत्ता

दापोली:- दापोली समुद्रात ६ जण बुडाल्याची घटना रविवारी घडली. बुडालेल्या ५ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रविवार सुट्टी असल्याने दापोली तालुक्यातील कर्दै येथील समुद्राचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पर्यटक आले होते. या ठिकाणी फिरत असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. स्नान करत असताना सर्व 6 जण समुद्रात मोठ्या पाण्यात खेचले गेले. समुद्रात बुडताना त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. स्थानिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाच जणांना वाचवले. मात्र त्यातील एक जण सापडला नाही. त्याचा शोध घेण्यात येत आहे. अद्यापपर्यंत त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.