Sunday, August 23, 2026
spot_img
Home खेड दरड कोसळून दीड महिना उलटला, प्रशासनाचे दुर्लक्ष

दरड कोसळून दीड महिना उलटला, प्रशासनाचे दुर्लक्ष

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावरील नातूनगर गावातून जाणाऱ्या महत्त्वाच्या नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून तब्बल दीड महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही दरड हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नातूनगर रस्ता हा शिवतर, जामगे, आंबये तसेच चिंचाळी मार्गे पुढील गावांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. परिसरातील नागरिक या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही वाढत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
दरड कोसळून दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही संबंधित यंत्रणेकडून रस्ता पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिक ग्रामस्थ सचिन सकपाळ यांनी याबाबत तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला आहे.
संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील दरड हटवावी व मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी सचिन सकपाळ यांनी केली आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून सणाच्या काळात या मार्गावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी नातूनगर रस्ता सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांचे जवळपास २० ते २५ किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीसाठी हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे.
रस्त्याची सद्यस्थिती लक्षात घेता प्रशासनाने आणखी विलंब न करता तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा सचिन सकपाळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.